निर्गम ७:१४-२५
१४
तेव्हा याहवेह मोशेला म्हणाले, “फारोहचे हृदय कठीण आहे आणि तो इस्राएली लोकांना जाऊ देण्यास नाकारतो.
१५
फारोह सकाळी बाहेर नदीकडे जात असताना त्याच्याकडे जा. नाईल नदीच्या काठावर जाऊन त्याची भेट घे आणि ज्या काठीचा साप झाला होता, ती काठी आपल्या हातात घे.
१६
मग त्याला सांग, ‘याहवेह, इब्रींचे परमेश्वर यांनी मला हे सांगण्यासाठी तुझ्याकडे पाठविले आहे: माझ्या लोकांना जाऊ दे, यासाठी की त्यांनी रानात जाऊन माझी उपासना करावी, पण अजूनही तू ऐकले नाहीस.
१७
याहवेह असे म्हणतात: यावरून मी याहवेह आहे हे तुला कळेल: माझ्या हातात जी काठी आहे, ती मी नाईल नदीच्या पाण्यावर मारीन, आणि तिचे रक्त होईल.
१८
मग नाईल नदीतील मासे मरतील आणि नदीला दुर्गंध सुटेल; इजिप्तचे लोक ते पाणी पिऊ शकणार नाहीत.’ ”
१९
मग याहवेह मोशेला म्हणाले, “अहरोनाला सांग, ‘आपली काठी घेऊन, इजिप्तचे पाणी म्हणजेच नद्या, नाले, तलाव व सर्व तळे यावर आपला हात लांब कर; आणि त्याचे रक्त होईल’ इजिप्तमध्ये सर्वत्र, लाकडी भांड्यात व दगडी पात्रात सुद्धा रक्त असेल.”
२०
मोशे व अहरोन यांनी याहवेहच्या आज्ञेप्रमाणे केले. अहरोनाने आपल्या हातातील काठी, फारोहच्या व त्याच्या सेवकांच्या समक्ष उंच केली आणि नाईल नदीच्या पाण्यावर मारली आणि नदीतील सर्व पाण्याचे रक्तात रूपांतर झाले.
२१
नाईल नदीतील सर्व मासे मेले, व त्यामुळे पाण्याला इतकी दुर्गंधी सुटली की इजिप्तच्या लोकांना ते पाणी पीता येईना, इजिप्त देशात सर्वत्र रक्त झाले होते.
२२
पण इजिप्तच्या जादूगारांनीही आपल्या गुप्तज्ञानाने पाण्याचे रक्त केले. फारोहचे मन पुन्हा कठीण झाले व याहवेहने सांगितल्याप्रमाणे त्याने मोशे व अहरोन यांचे ऐकले नाही.
२३
आणि फारोहने हे मनावर न घेता, तो आपल्या राजवाड्यात परतला.
२४
आणि इजिप्तच्या लोकांनी नाईल नदीच्या किनार्यावर खणले, कारण नदीचे पाणी ते पिऊ शकत नव्हते.
२५
याहवेहने नाईलवर प्रहार करून सात दिवस लोटले.
Settings