Skip to content
अनुवाद ७:१२-२६

अनुवाद ७:१२-२६

१२
तुम्ही या आज्ञा ऐकून त्या प्रामाणिकपणे पाळल्या, तर याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्या पूर्वजांना दिलेल्या अभिवचनाप्रमाणे हा प्रीतीचा करार पुढेही पाळीत राहतील.
१३
ते तुम्हावर प्रीती करतील, तुम्हाला आशीर्वाद देतील आणि तुम्हाला बहुगुणित करतील. तुमच्या पूर्वजांना देऊ केलेल्या वचनदत्त देशात ते तुमच्या पोटच्या फळाला, तुमच्या जमिनीतील पीक—तुमच्या धान्याला, नव्या द्राक्षारसाला, जैतुनाच्या तेलाला—तुमच्या गुरांची वासरे आणि तुमच्या कळपातील कोकरे यांनाही ते आशीर्वाद देतील.
१४
तुम्ही इतर लोकांपेक्षा अधिक आशीर्वादित व्हाल; तुमच्यापैकी कोणीही पुरुष वा स्त्री निःसंतान राहणार नाही किंवा तुमच्या पशूंपैकी कोणीही वांझ राहणार नाही.
१५
याहवेह तुमच्यातील सर्व रोग दूर करतील. इजिप्तमधील तुम्हाला माहीत असलेले भयंकर रोग ते तुमच्यावर आणणार नाहीत, तर तुमचा द्वेष करणार्‍या सर्वांवर ते रोग आणतील.
१६
याहवेह तुमचे परमेश्वर जे सर्व देश तुमच्या हाती देतील, त्यांचा तुम्ही पूर्णपणे संहार करावा. त्यांना दयामाया दाखवू नका व त्यांच्या दैवतांची सेवा करू नका. कराल, तर ते तुमच्यासाठी सापळा असे होईल.
१७
तुम्ही स्वतःशी म्हणाल, “ही राष्ट्रे आमच्यापेक्षा कितीतरी सामर्थ्यवान आहेत. आम्ही त्यांना कसे काय घालवून देऊ?”
१८
परंतु त्यांना भिऊ नका; याहवेह तुमच्या परमेश्वराने फारोहचे आणि संपूर्ण इजिप्त देशाचे काय केले याचे चांगले स्मरण ठेवा.
१९
याहवेह तुमच्या परमेश्वराने तुम्हाला इजिप्तमधून बाहेर काढून आणण्यासाठी सामर्थ्यशाली हाताने व पसरलेल्या भुजांनी जी भयंकर संकटे, महान चमत्कार व चिन्हे केली, ते सर्व तुम्ही प्रत्यक्ष पाहिले होते. तुम्हाला ज्या लोकांचे भय वाटते त्यासर्वांच्या सोबत याहवेह तुमचे परमेश्वर हेच करतील.
२०
शिवाय याहवेह तुमचे परमेश्वर त्यांना घालवून देण्यासाठी गांधीलमाशा पाठवतील, तुमच्यापासून लपून बसलेले देखील नाश पावतील.
२१
तुम्ही त्यांना भिऊ नका, कारण महान व भयावह असे याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाबरोबर आहेत.
२२
याहवेह तुमचे परमेश्वर त्या राष्ट्रांना हळूहळू घालवून देतील; कारण त्यांना एकदम घालवून दिल्यास हिंस्र पशूची संख्या वेगाने वाढेल आणि त्यांच्याकडून तुम्हाला धोका निर्माण होईल.
२३
परंतु त्यांच्यात खूप गोंधळ निर्माण करून त्यांचा नाश होईपर्यंत याहवेह तुमचे परमेश्वर त्यांना तुमच्या हातात देतील.
२४
ते त्यांच्या राजांना तुमच्या हाती देतील आणि तुम्ही त्यांची नावे या पृथ्वीतलावरून पुसून टाकाल. मग कोणीही तुमच्याविरुद्ध उभा राहणार नाही; तुम्ही त्यांचा नाश कराल.
२५
त्यांच्या दैवतांच्या मूर्ती तुम्ही जाळून टाका; त्यांच्या सोन्यारुप्याच्या लोभ धरू नका आणि ते स्वतःकरिता घेऊ नका, नाहीतर तुम्ही त्याद्वारे सापळ्यात अडकाल, कारण याहवेह तुमच्या परमेश्वराला याचा वीट आहे.
२६
नाशाचे कारण असलेली कोणतीही किळसवाणी वस्तू घरात आणू नका, तसे केल्यास तुमचा खात्रीने नाश होईल. ती घृणास्पद समजून तिचा अगदी वीट माना, कारण ती शापित आहे.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options