आमोस ९:१-६
१
मी प्रभूला वेदीजवळ उभे असलेले पाहिले आणि ते म्हणाले: “खांबांच्या वरच्या भागावर प्रहार करा म्हणजे उंबरठे हलतील. आणि ते सर्व लोकांच्या डोक्यावर खाली पाड; जे त्यातून वाचतील त्यांना मी तलवारीने मारून टाकीन. एक सुद्धा वाचणार नाही, कोणीही निसटणार नाही.
२
खोल खणीत ते अधोलोकापर्यंत जाऊन पोहोचले, तरी तिथे जाऊन माझ्या हात त्यांना वर ओढून आणेन; वर चढत ते आकाशापर्यंत आले, तरी तिथूनही मी त्यांना खाली आणेन.
३
कर्मेल पर्वताच्या शिखरावर ते लपून राहिले, तरी मी त्यांची शिकार करून त्यांना पकडेन. ते महासागराच्या तळाशी माझ्या दृष्टिआड लपून बसले तरी, मी सर्पाला त्यांना चावा घेण्याची आज्ञा देईन.
४
जरी शत्रूंनी त्यांना कैद करून बंदिवासात नेले, तरी मी तलवारीला त्यांना ठार मारण्याची आज्ञा देईन. “मी त्यांच्यावर माझी नजर ठेवेन ती तर हानीसाठी असणार भल्यासाठी नाही.”
५
प्रभू, सेनाधीश याहवेह— भूमीला स्पर्श करतात आणि ती विरघळून जाते, आणि त्यामध्ये राहणारे सर्व लोक शोक करतात. संपूर्ण देश नाईल नदीसारखा वर येतो आणि इजिप्तच्या नदीप्रमाणे खाली बुडतो;
६
ते आकाशात आपले भव्य राजवाडे बांधतात आणि त्याचा पाया पृथ्वीवर ठेवतात; ते समुद्राच्या पाण्याला बोलवितात आणि ते पृथ्वीच्या पृष्ठभागावर ओततात; याहवेह हे त्यांचे नाव आहे.
Settings