2 इतिहास ७:१-११
१
शलोमोनाने जेव्हा प्रार्थना करण्याचे संपविले, तेव्हा आकाशातून अग्नी खाली आला आणि त्याने होमार्पणे आणि बलिदाने भस्मसात करून टाकली आणि याहवेहच्या गौरवाने मंदिर भरून गेले.
२
याजकगण याहवेहच्या मंदिरात प्रवेश करू शकले नाहीत, कारण याहवेहच्या गौरवाने ते मंदिर भरून गेले होते.
३
जेव्हा सर्व इस्राएली लोकांनी पाहिले की, अग्नी खाली उतरत आहे आणि याहवेहचे गौरव मंदिराच्या वर आहे तेव्हा त्यांनी पदपथावर गुडघे टेकून त्यांची मुखे जमिनीकडे केली आणि आराधना केली आणि याहवेहना असे म्हणत धन्यवाद दिला, “ते चांगले आहेत; त्यांची प्रीती सर्वकाळ टिकते.”
४
नंतर राजा आणि सर्व लोकांनी याहवेहसमोर होमार्पणे केली.
५
शलोमोन राजाने बावीस हजार गुरे, एक लाख वीस हजार मेंढरे व बोकडे अर्पण केली. याप्रकारे राजाने व सर्व लोकांनी परमेश्वराच्या मंदिराची प्रतिष्ठापना केली.
६
याजकांनी आपआपले स्थान ग्रहण केले, दावीद राजाने याहवेहची स्तुती करण्यासाठी व “त्यांची प्रीती सर्वकाळ टिकून राहते” असे म्हणत आभार मानले होते, तेव्हा जशी संगीतवाद्यांची रचना केली होती आणि त्यांचा उपयोग केला होता, तशाच प्रकारे लेवी लोकांनीही स्थान ग्रहण केले. लेव्यांच्या समोरच्या बाजूला याजकगण त्यांचे रणशिंग वाजवित होते आणि सर्व इस्राएली लोक उभे होते.
७
शलोमोनाने याहवेहच्या मंदिरापुढच्या द्वारमंडपाचा मधील भाग पवित्र केला, आणि तिथे त्याने होमार्पणे व शांत्यर्पणाचे मांदे ही अर्पण केली, कारण जी कास्याची वेदी त्याने बनविली होती त्यात होमार्पणे, धान्यार्पणे व मांदे मावत नव्हते.
८
तेव्हा शलोमोन आणि सर्व इस्राएली लोकांनी त्याच्याबरोबर सात दिवस सण साजरा केला—एक मोठी मंडळी, म्हणजे लेबो हमाथपासून इजिप्तच्या खाडीपर्यंतचे राहिवासी आले होते.
९
आठव्या दिवशी त्यांनी सभा भरविली, कारण त्यांनी सात दिवस वेदीवर समर्पण आणि आणखी सात दिवस उत्सव साजरा केला होता.
१०
सातव्या महिन्याच्या तेविसाव्या दिवशी त्याने लोकांना त्यांच्या घरी रवाना केले, याहवेहने दावीद आणि शलोमोन आणि त्यांच्या इस्राएली लोकांसाठी जी चांगली कृत्ये केली, त्यासाठी त्यांच्या अंतःकरणात हर्ष आणि आनंद होता.
११
शलोमोनाने याहवेहचे मंदिर आणि राजमहालाचे काम संपविले आणि याहवेहच्या मंदिरात व आपल्या राजवाड्यात जे काही करावे असे त्याचे मनोरथ होते ते सर्व करण्यात तो यशस्वी झाला.
बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.
Settings