2 इतिहास ६:४-१५
४
मग राजा म्हणाला: “याहवेह इस्राएलचे परमेश्वर धन्यवादित असोत, कारण त्यांनी माझे वडील दावीदाला आपल्या मुखाने दिलेले वचन आज स्वहस्ते पूर्ण केले आहे. कारण याहवेहने म्हटले होते की,
५
‘मी माझ्या लोकांना इजिप्तमधून बाहेर आणले, त्या दिवसापासून इस्राएलातील कोणत्याही गोत्राचे शहर माझ्या नावाने मंदिर तिथे बांधावे म्हणून मी निवडले नाही, ज्यामुळे माझे नाव तिथे असावे किंवा माझ्या इस्राएली लोकांवर राज्य करण्यासाठी मी कोणालाही राज्यकर्ता म्हणून निवडले नाही.
६
परंतु आता येथे माझे नाव असावे म्हणून मी यरुशलेमला निवडले आहे आणि माझ्या इस्राएल लोकांवर राज्य करण्यासाठी मी दावीदाची निवड केली आहे.’
७
“याहवेह इस्राएलच्या परमेश्वराच्या नावासाठी मंदिर बांधावे असे माझे वडील दावीद यांच्या मनात होते.
८
पण याहवेहने माझे पिता दावीदाला म्हटले, ‘माझ्या नावासाठी मंदिर बांधावे अशी आपल्या हृदयात इच्छा बाळगून तू फार चांगले केले.
९
तथापि, तू ते मंदिर बांधणार नाहीस, तर तुझा पुत्र, तुझ्या स्वतःच्या हाडामांसाचा; तोच माझ्या नावासाठी मंदिर बांधील.’
१०
“याहवेहने दिलेले वचन पूर्ण केले आहे: माझे वडील दावीदाचा मी वारस झालो आणि याहवेहने अभिवचन दिल्याप्रमाणे आता इस्राएलच्या राजासनावर मी बसतो आणि याहवेह इस्राएलचे परमेश्वर यांच्यासाठी मी हे मंदिर बांधले आहे.
११
तिथे कोशासाठी मी एक स्थान तयार केले आहे, ज्यात इस्राएली लोकांबरोबर याहवेहने केलेला करार आहे.”
१२
नंतर इस्राएलच्या सर्व मंडळीदेखत शलोमोन याहवेहच्या वेदीसमोर उभा राहिला, आणि त्याने आपले हात पसरले
१३
शलोमोनाने आता पाच हात लांब आणि पाच हात रुंद आणि तीन हात उंच असा एक कास्याचा मंच तयार केला होता आणि तो बाहेरील अंगणाच्या मध्यभागी ठेवण्यात आलेला होता. तो त्या मंचावर उभा राहिला आणि त्याने इस्राएलच्या सर्व मंडळीदेखत गुडघे टेकले आणि स्वर्गाकडे आपले हात पसरले.
१४
तो म्हणाला: “याहवेह, इस्राएलच्या परमेश्वरा, स्वर्गात किंवा पृथ्वीवर तुमच्यासारखा परमेश्वर नाही; जे आपले सेवक सर्व हृदयाने आपल्या मार्गात चालतात त्यांच्याशी आपण आपल्या प्रीतीच्या कराराची पूर्तता करतात.
१५
आपला सेवक, माझे पिता दावीदाला दिलेले अभिवचन आपण पाळले आहे; आपण आपल्या मुखाने अभिवचन दिले आणि स्वहस्ते ते आज पूर्ण केले आहे.
Settings