नीतिसूत्रे ८:१-११
१
सुज्ञान हाक मारीत नाही काय? समंजसपणा तिचा आवाज उंचावत नाही का?
२
रस्त्याच्या कडाला असलेल्या सर्वात उंच जागेवर, जिथे रस्ते जोडले जातात, तिथे ती उभी राहते;
३
शहरात जाणार्या वेशीच्या बाजूला, प्रवेशद्वाराजवळ ती ओरडून सांगते:
४
“अहो लोकांनो, मी तुम्हाला बोलाविते; सर्व मानवजातीला उद्देशून मी माझा आवाज उंचाविते.
५
तुम्ही जे साधे भोळे आहात, समंजसपणा मिळवा; तुम्ही जे मूर्ख आहात, तुमचे लक्ष तिच्याकडे लावा.
६
ऐका! कारण मला काही विश्वसनीय गोष्टी सांगावयाच्या आहेत; योग्य ते सांगण्यासाठीच मी माझे मुख उघडते.
७
माझे मुख सत्य बोलते, कारण माझे ओठ वाईटाचा तिरस्कार करतात.
८
माझ्या मुखातील सर्व शब्द नीतियुक्त आहेत; त्यातील कोणतेही कुटिल किंवा विकृत नाहीत.
९
जे समजूतदार आहेत त्यांच्यासाठी ते योग्य आहेत; ज्यांना ज्ञान प्राप्त झाले आहे त्यांना माझी वचने सुबोध आहेत.
१०
चांदीऐवजी माझ्या शिक्षणाची, आणि उत्कृष्ट सोन्यापेक्षा ज्ञानाची निवड कर.”
११
कारण सुज्ञान माणकांपेक्षा उत्तम आहे; तुला आवडणाऱ्या इतर कशाशीही तिची तुलना करता येणार नाही.
Settings