गणना २८:५-१५
५
त्याबरोबर धान्यार्पणासाठी एक एफाचा दहावा भाग बारीक पीठ, कुटून काढलेल्या एक पाव हीन जैतुनाच्या तेलात मळून अर्पण करावे.
६
सीनाय पर्वतावर स्थापित केलेले हे नियमितपणाचे होमार्पण याहवेहला आवडणारे सुवासिक अन्नार्पण आहे.
७
त्याबरोबरचे पेयार्पण, एका कोकर्याबरोबर एक पाव आंबवलेले पेय असावे. हे पेयार्पण याहवेहसाठी पवित्रस्थानी ओतावे.
८
दुसरे कोकरू संध्याकाळी अर्पावे, सकाळच्या अर्पणाप्रमाणे धान्यार्पण व पेयार्पण यासहित अर्पण करावे. हे अन्नार्पण याहवेहसाठी सुवासिक अर्पण आहे.’ ”
९
“शब्बाथ दिवशी एक वर्षाची दोन निर्दोष कोकरे, व त्याबरोबर पेयार्पण व जैतुनाच्या तेलात मळलेले एका एफाचे दोन दशांश बारीक पीठ धान्यार्पण असे अर्पण करावे.
१०
नियमित होमार्पण व त्याचे पेयार्पण याशिवाय प्रत्येक शब्बाथ दिवसाचे हे होमार्पण आहे.
११
“प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी दोन तरुण गोर्हे, एक मेंढा आणि एक वर्षाची सात कोकरे होमार्पण म्हणून याहवेहसाठी अर्पण करावे, हे सर्व निर्दोष असावेत.
१२
प्रत्येक गोर्ह्याबरोबर धान्यार्पण म्हणून तेलात मळलेले एका एफाचे तीन दशांश बारीक पीठ; आणि एका मेंढ्याबरोबर धान्यार्पण म्हणून तेलात मळलेले दोन दशांश बारीक पीठ;
१३
आणि प्रत्येक कोकर्याबरोबर धान्यार्पण म्हणून तेलात मळलेले एक दशांश बारीक पीठ अर्पण करावे. हे होमार्पण सुवासिक अर्पण, अन्नार्पण म्हणून याहवेहसाठी सादर करावे.
१४
प्रत्येक गोर्ह्याबरोबर अर्धा हीन पेयार्पण; आणि प्रत्येक मेंढ्याबरोबर एकतृतीयांश हीन, व प्रत्येक कोकर्याबरोबर एक पाव हीन द्राक्षारस आणावा. वर्षभरातील प्रत्येक पोर्णिमेच्या दिवशी करावयाचे हे मासिक होमार्पण आहे.
१५
नियमित होमार्पण व त्याचे पेयार्पण याशिवाय एक बोकड पापार्पण म्हणून याहवेहला सादर करावा.
Settings