यहोशुआ १:१-९
१
याहवेहचा सेवक मोशेच्या मृत्यूनंतर, मोशेचा मदतनीस, नूनाचा पुत्र यहोशुआला याहवेह म्हणाले:
२
“माझा सेवक मोशे मरण पावला आहे, तर आता तू आणि हे सर्व लोक यार्देन नदी ओलांडून त्या देशात जाण्यास तयार व्हा, जो मी त्यांना, म्हणजे इस्राएली लोकांना देत आहे.
३
मी मोशेला दिलेल्या वचनानुसार जिथे तुम्ही तुमचे पाऊल ठेवाल ते प्रत्येक ठिकाण मी तुम्हाला देईन.
४
तुमची सीमा वाळवंटापासून लबानोन पर्यंत आणि महान नदी फरातपासून, सर्व हिथी देश, ते पश्चिमेकडे भूमध्य समुद्रापर्यंत असेल.
५
तुमच्या आयुष्यातील सर्व दिवस तुम्हाला कोणीही विरोध करू शकणार नाही, कारण मी जसा मोशेबरोबर होतो तसाच तुझ्याबरोबरही असेन; मी तुला कधीही सोडणार नाही किंवा टाकणार नाही.
६
खंबीर हो आणि हिंमत धर, कारण जो देश या लोकांच्या पूर्वजांना वारसा म्हणून देण्याची मी शपथ वाहिली त्या देशात नेण्यासाठी तू त्यांचे नेतृत्व करशील.
७
“मात्र तू खंबीर हो आणि फार धैर्यवान हो. माझा सेवक मोशेने तुम्हाला दिलेले सर्व नियम पाळण्याची काळजी घे; त्यापासून उजवीकडे किंवा डावीकडे वळू नको, म्हणजे जिथे तू जाशील तिथे तू यशस्वी होशील.
८
शास्त्रग्रंथातील हे नियम नेहमी तुझ्या मुखात असू दे; दिवसा आणि रात्री त्यांचे मनन कर, त्यात लिहिलेल्या सर्व गोष्टींचे काळजीपूर्वक पालन करशील, तर तुझी भरभराट होईल आणि तू यशस्वी होशील.
९
मी तुला आज्ञापिले नाही का? खंबीर हो आणि धैर्यवान हो. भिऊ नको; निराश होऊ नको, कारण तू जिथे जाशील तिथे याहवेह तुझे परमेश्वर तुझ्याबरोबर असतील.”
Settings