यहेज्केल २०:३४-४४
३४
मी तुम्हाला राष्ट्रांमधून आणेन आणि ज्या ठिकाणी तुम्ही पांगला आहात त्या देशांमधून; बलवान हाताने, उगारलेल्या बाहूने व क्रोधवृष्टी करीत मी तुम्हाला एकत्र करेन.
३५
राष्ट्रांच्या रानात मी तुम्हाला आणेन आणि तिथे समोरासमोर मी तुमचा न्याय करेन.
३६
इजिप्त देशाच्या रानात जसा मी तुमच्या पूर्वजांचा न्याय केला, तसाच मी तुमचा न्याय करेन, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.
३७
माझ्या काठीखालून तुम्ही जात असता मी बारकाईने तुम्हाला पाहीन आणि तुम्हाला कराराच्या बंधनात आणेन.
३८
जे माझ्याविरुद्ध उठतात आणि बंड करतात त्यांच्यापासून मी तुम्हाला वेगळे करेन. जरी ज्या देशात ते राहतात तिथून मी त्यांना बाहेर आणेन, तरीही इस्राएल देशात ते प्रवेश करणार नाहीत. तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.
३९
“ ‘अहो इस्राएली लोकहो, तुमच्याविषयी म्हटले तर, सार्वभौम याहवेह असे म्हणतात: जा तुम्ही प्रत्येकजण तुमच्या मूर्तींची सेवा करा! परंतु त्यानंतर तुम्ही खचितच माझे ऐकाल आणि तुमच्या भेटींनी व मूर्तींनी माझे नाव आणखी अपवित्र करणार नाही.
४०
कारण सार्वभौम याहवेह जाहीर करतात, माझ्या पवित्र पर्वतावर, इस्राएलातील उंच पर्वतावर त्या भूमीवर इस्राएलचे सर्व लोक माझी सेवा करतील आणि तिथे मी त्यांचा स्वीकार करेन. तिथे तुमच्या सर्व पवित्र यज्ञांबरोबर तुमची अर्पणे व तुमच्या उत्तम भेटी मी मागेन.
४१
जेव्हा मी तुम्हाला राष्ट्रांतून बाहेर आणेन आणि ज्या देशांमध्ये तुमची पांगापांग झाली तिथून मी तुम्हाला एकत्र करेन, तेव्हा सुवासिक धुपाप्रमाणे मी तुम्हाला स्वीकारेन आणि मी तुमच्याद्वारे राष्ट्रांदेखत पवित्र मानला जाईन.
४२
जेव्हा इस्राएल देश, जो देश मी माझा हात उंच करून तुम्हाला शपथ वाहून दिला होता त्यात मी तुम्हाला आणेन, तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.
४३
तिथे तुम्ही तुमचे वर्तन व तुमची कृत्ये, ज्यामुळे तुम्ही स्वतःस भ्रष्ट केले त्यांची आठवण कराल आणि ज्या सर्व वाईट गोष्टी तुम्ही केल्या त्यामुळे तुम्ही स्वतःचा वीट कराल.
४४
इस्राएलाच्या घराण्या तुमचे वाईट मार्ग आणि दुष्कर्मांनुसार नाही तर माझ्या नामाकरिता मी तुमच्याशी वागेन, तेव्हा तुम्ही जाणाल मीच याहवेह आहे, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.’ ”
Settings