अनुवाद ९:१५-२१
१५
नंतर मी मागे वळलो आणि पर्वतावरून खाली उतरत असताना पर्वत अग्नीने जळत होता आणि त्या कराराच्या दोन पाट्या माझ्या हातात होत्या.
१६
जेव्हा मी पाहिले की, याहवेह तुमच्या परमेश्वराविरुद्ध तुम्ही पाप केले आहे; तुम्ही तुमच्यासाठी वासराची ओतीव मूर्ती घडविली, असे माझ्या दृष्टीस पडले. याहवेहनी दिलेल्या आज्ञा पाळण्याचे सोडून तुम्ही किती लवकर पथभ्रष्ट झालात.
१७
तेव्हा मी त्या दोन दगडी पाट्या घेतल्या आणि माझ्या हातांतून फेकून, तुमच्या डोळ्यादेखत त्यांचा चुराडा केला.
१८
नंतर आणखी चाळीस दिवस व चाळीस रात्री मी याहवेहपुढे पालथा पडून राहिलो; मी भाकर खाल्ली नाही आणि पाणीदेखील प्यालो नाही, कारण याहवेहच्या दृष्टीने वाईट आहे, तेच पाप तुम्ही करून त्यांचा क्रोध भडकाविला होता.
१९
मला याहवेहच्या रागाची आणि क्रोधाची भीती वाटली, कारण ते तुमचा नाश करण्याइतके रागावले होते. परंतु त्यावेळी सुद्धा याहवेहने माझे ऐकले.
२०
आणि याहवेह अहरोनवर अत्यंत संतप्त झाले व त्याचा नाश करणार होते, परंतु मी त्याच्यासाठी देखील प्रार्थना केली.
२१
मी तुमचे पापकृत्य, म्हणजे जे वासरू तुम्ही बनविले होते ते घेतले आणि अग्नीत जाळून त्याची कुटून धुळीसारखी बारीक पूड केली आणि ती धूळ डोंगरातून वाहणार्या ओहोळात फेकून दिली.
Settings