Skip to content
अनुवाद ३०:१-१०

अनुवाद ३०:१-१०

मी तुमच्यापुढे ठेवलेले हे सर्व आशीर्वाद आणि शाप तुम्हावर येतील, तेव्हा याहवेह तुमच्या परमेश्वराने तुम्हाला घालवून दिलेल्या देशात राहत असताना तुम्ही या गोष्टी आपल्या अंतःकरणात ठेवाव्या,
आणि त्यावेळी जर तुम्ही व तुमची मुले याहवेह तुमच्या परमेश्वराकडे परत याल आणि संपूर्ण मनाने व संपूर्ण जिवाने आज मी तुम्हाला देत आहे त्या त्यांच्या आज्ञा पाळाल,
तर याहवेह तुमचे परमेश्वर तुमची बंदिवासातून सुटका करतील आणि ते तुमच्यावर दया करतील आणि ज्या देशात त्यांनी तुम्हाला पांगवून टाकले असेल, त्या देशातून तुम्हाला एकत्र करतील.
तुम्ही पृथ्वीच्या अगदी दिगंतापर्यंत विखुरलेले असला, तरी याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला तिथून पुन्हा परत आणतील.
याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला तुमच्या पूर्वजांच्या देशात परत आणतील आणि तुम्ही तो ताब्यात घ्याल. ते तुमचे कल्याण करतील आणि तुमच्या पूर्वजांपेक्षा तुम्हाला अधिक संपन्न आणि बहुगुणित करतील.
याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्या व तुमच्या वंशजांच्या अंतःकरणाची सुंता करतील, तुम्ही त्यांच्यावर पूर्ण मनाने व आत्म्याने प्रीती कराल, मग याद्वारे तुम्ही जिवंत राहू शकाल.
याहवेह तुमचे परमेश्वर हे सर्व शाप तुमच्या शत्रूंवर, म्हणजे जे तुमचा द्वेष करतात व तुमचा छळ करतात, त्यांच्यावर आणतील.
तुम्ही परत याहवेहच्या आज्ञा पाळाल आणि मी आज तुम्हाला देत असलेल्या त्यांच्या सर्व आज्ञेचे तुम्ही पालन कराल.
तेव्हा याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्या हाताच्या प्रत्येक कार्यात तुम्हाला समृद्धी प्रदान करतील. ते तुम्हाला विपुल संतती, पुष्कळ गुरे आणि तुमच्या भूमीला अमाप पीक देतील. याहवेह तुमच्या पूर्वजांवर जसे प्रसन्न होते, तसेच तुमच्या कल्याणासाठी तुम्हावरही परत प्रसन्न होतील,
१०
जर तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञा पाळाल आणि नियमशास्त्राच्या या ग्रंथात याहवेह तुमच्या परमेश्वराने जे नियम व विधी दिले आहेत, त्या तुम्ही पाळाल व पूर्ण मनाने व आत्म्याने याहवेह तुमच्या परमेश्वराकडे माघारी वळाल, तर हे होईल.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options